Thursday, February 25, 2010

किस्से शीचे

१. माझा मामा अरुण भालेराव याने एक मजेशीर किस्सा कळवला तो असा:
ही माझ्या वडिलांची गोष्ट आहे. तेंव्हा ते औरंगाबादी इंटर ला शिकायला होते. पाच सहा मित्र मिळून खोली घेऊन रहात असत. त्या काळी संडास अर्थातच विरळा असत. गटाराने वा कुठे झुडुपा मागे कार्यभाग साधावा लागे. खोलीच्या शेजारी राहणार्‍या गृहस्थांचा भला मोठा बंगला होता. मोठी बाग होती. हगणार्‍यांना जणु नंदनवनच.
तर ही मुले सकाळ्ळीच उठून बागेत घाईघाईने हगून येत. ते त्या बंगलेवाल्याला अर्थातच आवडत नसे. एक दिवस तो पाळत ठेवून होता. तीन चार मुलांनी शी करायला तरीही हजेरी लावलीच. आता तो बंगलेवाला ह्यांना रंगे-ढुंगण पकडणार तोच ती तरणी शी-बहाद्दर मुले , टमरेल तिथेच टाकून भिंतीवरून उड्या टाकून पळाली. शेजारी पोलिसांना घेऊन ह्यांच्या खोलीवर हजर. पुरावा काय असे मुलांनी विचारताच त्याने पोलिसाला शी कशी ताजी आहे ते हात लावून पहायला सांगितले. पोलिसाला ते किळसवाणे वाटले. मग त्याने मुलांना नुसताच हग्या दम भरला व पुन्हा हगू नका अशी ताकीद दिली. तर उघड्यावर शी करणे असे धोक्याचे असते व पुरावा कोणी पुरवू शकत नाही ह्याची पळवाट असते असे दोन शी-धडे हयावरून घेता येतात!

२. परवा माझा मित्र प्रसाद बोकील यानं ज़ुळ्या बाळांच्या शीचा एक मजेशीर किस्सा सांगितला तो असा:
ही ज़ुळी बाळं एकाच दुपट्यात. आणि अगदी एकमेकांना अगदी लागून एकाच दुपट्यावर निवांत पडलेली. त्यापैकी एकाने केली शी. आणि ती दुपट्यावर पसरली. आता कळेना शी केली कुणी?! म्हणून दोघांचीपण धुण्यात आली. परत काहीवेळाने दुसर्‍याने केली असणार. तेव्हा कळले नाहीच केली कुणी म्हणून पुन्हा दोघांचीही धुण्यात आली.
यात अशी शक्यता आहे की दोन्ही वेळेस एकानेच शी केली असावी. आणि दुसर्‍याची फुकटच धुतली गेली असावी. यात नेमके काय झाले असावे याचा Probability च्या अभ्यासकांनी/विद्यार्थ्यांनी शोध घ्यावा आणि त्यातील तमाम शक्यतांपैकी एक खरोखरच घडली असेल !