Saturday, June 29, 2013

जपानी शेतकरी आणि शी


जपानात जेव्हा एखादा शेतकरी, मुशाफीर, यात्रेकरू, प्रवासी कुणीही शेतावरून जात असे तेव्हा त्या पाहुण्याचे आतिथ्य करणे हे त्या शेतकर्‍याला आपले कर्तव्य वाटे. तेव्हा या प्रवाशाला रात्रीचं जेवण देऊन त्याला रात्रीचा   मुक्काम तिथेच ठोकण्याचा अर्थातच आग्रह केला जात असे. सकाळी मग याने प्रवासाला जावे, असा हा आतिथ्याचा प्रकार.
खरी मेख सकाळी उठल्यावर आहे. आपल्या ब्लॉगवाचकांना सांगणे नलगे! होय! शी! सकाळी या पट्ठ्याने शी न करता निरोप दिला तर तो जापानी शेतकरी आपला अपमान समजत असे. म्हणजे यानी रात्री जेवण केलं आणि सकाळी शी न करताच जातो म्हणजे काय! हे बरोबर आहे क! नाही ना!?
याने शेतात शी करायची ती पुरली जाणार. तिचं खत होणार आणि आपल्या पाहुण्याने आपल्याला आतिथ्याची संधी ती दिलीच शिवाय खतरूपी शीही! शीला हे खताचं अंग आहे म्हणून कसा सांस्कृतिक रंग चढलाय या शीणण्याला! त्यातलेही काही आध्यात्मिक किंवा प्रवाशाशी बंध निर्माण झालेले यजमान शेतकरी म्हणत असतील, “आता तू जा, शीरूपाने आता तुझे वास्तव्य इथे सदासर्वदा राहील. त्या शीचे खत होईल, खताचा उपयोग धान्याला होईल आणि अन्नरूपाने तू परत आमच्यात आणि आमच्या इतर पाहुण्यांमध्ये प्रवेश करशील!”
[एक प्रश्न: तुम्हाला जपानला जाणे म्हणजे शीला जाणे हा शब्दप्रयोग माहीत आहे का?]


Tuesday, March 15, 2011

विदे-शी

[आमचे स्नेही श्री. आशिष कुलकर्णी यांनी त्यांचा हा मनमोकळा अनुभव आमच्या ब्लॉगावर छापण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार. ते सध्या उल्म, जर्मनी येथे अतिसूक्ष्मतम-पदार्थविज्ञान (Nanomaterial Science) याविषयात उच्चशिक्षण घेत आहेत].

शी : हान ...तर इथे येऊनही मी माझ्या भारतीय पद्धती विसरू शकत नाही याचे अगदी महत्वाचे आणि रोजचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे माझी शी करण्याची पद्धत ..इथे कमोड पद्धती आहे...नुसती पुसा पुशी जी माझ्या भारतीय मनाला आणि शरीराला रुचत नाही... कितीही पुसलं तरी "स्वच्छ नाही झालं वाटतं" ही साशंकता शिवाय नंतर वास येईन की काय ही त्याहून मोठी भीती ...आणि पादलो बिदलो कधी तर "चड्डी थोडी खराब झाली असेल" हे कुतूहल .. असो, माझ्या एकट्यासाठी कोणी भारतीय शैलीचा संडास इथे बांधणार नाही...! त्यामुळी ती अपेक्षा करणं व्यर्थ आहे....शिवाय भारतीय पद्धतच म्हणालं तर .. बाहेर जाऊन करावं म्हणलं तर... थंडी इतकी की बाहेर कुठे टमरेल घेऊन जाणे हे म्हणजे शाप दिल्याप्रमाणे ...हाता पायाला जिथे थंडी सोसवत होत नाही तिथे अशी कामे करून नसती रिस्क कशाला घ्या ..जरी घ्यायची म्हणलं आणि थंडीमुळे शी बाहेर येतानाच गोठली तर ?? देवा देवा ! त्यामुळे ह्या महत्वाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी मी दीड लिटर ची एक (कोल्ड्रिंक ची) बाटली नळाला येणाऱ्या गरम पाण्याने पुरेपूर भरून घेऊन संडासातच जातो.. आणि कमोड वरच भारतीय पद्धतीने बसतो..आणि आरामात कार्यक्रम उरकतो....कसलाही त्रास नाही... काही वेगळं पण वाटत नाही.. भारतीय फीलच असतो..फक्त तोल जरा सांभाळावा लागतो..! शी ला जाताना ".... फिर भी दिल है हिंदुस्तानी " हे गाणं आठवत..! :) इथल्या कमोड चे डिझाईन पण जरा चांगले म्हणावे म्हणजे त्यातील पाण्यात जरी शी वेगाने प्रवेश करती झाली तरी वापस तेच पाणी चिडून पायावर येत नाही .. जर्मन डिझाईन चे आभार ! मुंबईला कंपनी मध्ये असा प्रयोग एकदा करून पाहिला होता तेव्हा शी च landing कमोडच्या उतारी भागावर मुद्दाम मोठ्या प्रयत्नाने करावं लागायच जेणेकरून खालचे तीर्थ अंगावर उडू नये.. पण घडायचं उलट .. ह्याचा मनोमन राग आला तरी गरज आपलीच म्हणुन पर्याय नसायचा ...त्यामुळे मुंबईतल्या कमोड डिझाईन चा धिक्कार असो !

Thursday, February 25, 2010

किस्से शीचे

१. माझा मामा अरुण भालेराव याने एक मजेशीर किस्सा कळवला तो असा:
ही माझ्या वडिलांची गोष्ट आहे. तेंव्हा ते औरंगाबादी इंटर ला शिकायला होते. पाच सहा मित्र मिळून खोली घेऊन रहात असत. त्या काळी संडास अर्थातच विरळा असत. गटाराने वा कुठे झुडुपा मागे कार्यभाग साधावा लागे. खोलीच्या शेजारी राहणार्‍या गृहस्थांचा भला मोठा बंगला होता. मोठी बाग होती. हगणार्‍यांना जणु नंदनवनच.
तर ही मुले सकाळ्ळीच उठून बागेत घाईघाईने हगून येत. ते त्या बंगलेवाल्याला अर्थातच आवडत नसे. एक दिवस तो पाळत ठेवून होता. तीन चार मुलांनी शी करायला तरीही हजेरी लावलीच. आता तो बंगलेवाला ह्यांना रंगे-ढुंगण पकडणार तोच ती तरणी शी-बहाद्दर मुले , टमरेल तिथेच टाकून भिंतीवरून उड्या टाकून पळाली. शेजारी पोलिसांना घेऊन ह्यांच्या खोलीवर हजर. पुरावा काय असे मुलांनी विचारताच त्याने पोलिसाला शी कशी ताजी आहे ते हात लावून पहायला सांगितले. पोलिसाला ते किळसवाणे वाटले. मग त्याने मुलांना नुसताच हग्या दम भरला व पुन्हा हगू नका अशी ताकीद दिली. तर उघड्यावर शी करणे असे धोक्याचे असते व पुरावा कोणी पुरवू शकत नाही ह्याची पळवाट असते असे दोन शी-धडे हयावरून घेता येतात!

२. परवा माझा मित्र प्रसाद बोकील यानं ज़ुळ्या बाळांच्या शीचा एक मजेशीर किस्सा सांगितला तो असा:
ही ज़ुळी बाळं एकाच दुपट्यात. आणि अगदी एकमेकांना अगदी लागून एकाच दुपट्यावर निवांत पडलेली. त्यापैकी एकाने केली शी. आणि ती दुपट्यावर पसरली. आता कळेना शी केली कुणी?! म्हणून दोघांचीपण धुण्यात आली. परत काहीवेळाने दुसर्‍याने केली असणार. तेव्हा कळले नाहीच केली कुणी म्हणून पुन्हा दोघांचीही धुण्यात आली.
यात अशी शक्यता आहे की दोन्ही वेळेस एकानेच शी केली असावी. आणि दुसर्‍याची फुकटच धुतली गेली असावी. यात नेमके काय झाले असावे याचा Probability च्या अभ्यासकांनी/विद्यार्थ्यांनी शोध घ्यावा आणि त्यातील तमाम शक्यतांपैकी एक खरोखरच घडली असेल !


Friday, January 29, 2010

उघड्यावरील शी...

जगात दोन गट आहेत. उघड्यावर शी करणारे आणि उघड्यावर शी न करणारे. पहिल्यातल्यांना दुसर्‍यांच्या ठिकाणी होत नाही, आणि दुसर्‍यातल्यांना पहिल्यांच्या ठिकाणी! खेडोपाड्यात कितीही सिमेंट कॉंक्रिटाची शौचालये बांधून दिली, रेडिओवर उघड्यावर करून नये या आशयाच्या जाहिराती वाज़वल्या तरी उघड्यावर करणे काही थांबत नाही. एक तर त्यांना त्याची सवय असते, आणि त्यांना आत (शौचालयात) करायला हरकत असते असे नाही तर ते गेले तरी त्या बंदिस्त ठिकाणी त्यांना होतच नाही. सवय हे कारण तर आहेच. ज़शी उघड्यावर शी न करणार्‍यांमध्ये भारतीय शैलीची सवय असणार्‍यांना पाश्चात्त्य शैलीच्या कमोडवर भारतीय पद्धतीने बसल्याशिवाय होत नाही, तशीच उघड्यावर करणार्‍यांना आत (कसेही) बसून होत नाही.

आज़ही खेडोपाड्यांमधून हगंदरी अशी ज़ागा असतेच. आणि खोडोपाड्यात नाही तर रेल्वेने प्रवास करतांना तर अनेक ज़ण बसलेले दिसतात. काही ज़ण जे उगाच का उभे आहेत असे वाटतात, ते खरंतर रेल्वे प्रवाशांच्या लाज़ेने करता करता उठून उभे राहिलेले असतात. म्हणजे आधी ते उपविष्टच (‘उपविष्ठ’ ही बहुधा) असतात. रेल्वेने त्यांचे उत्थान केलेले असते. पण काही कोडगे म्हणा किंवा निर्भीड म्हणा किंवा "काय च्यायला प्रत्येक रेल्वेला राष्ट्रगीताला मान दिल्यागत उभं राहायचं! त्यापेक्षा बसा करत" असा विचार करणारे म्हणा, किंवा "ज़ाऊ द्या ना राव! बघू दे साल्यांना! आपली परत कुठे त्यांच्याशी गाठ पडणार आहे आणि बघितली तरी आपली सध्या पिवळीच आहे आणि आपलीच लाल असा सध्या तरी आपला दावा नाहीये" असा विचार करत बसूनच असतात. हीच ती निर्विकल्प समाधी! त्यांना अनेकांप्रमाणे या सुविचाराने पछाडलेले असते "त्यागाच्छान्तिर्निरन्तरम्‌" [त्यागात्‌ शान्तिः निरन्तरम्‌ = त्यागानेच (येथे मलत्याग) निरंतर शांतीचा लाभ होतो!].

गावकरी सरकारच्या शौचालयांना का भीक घालत नाहीत आणि त्यांची रूपांतरे लवकरच गोठा इ.त का होऊन ज़ातात याचा शोध घेण्यास माझा हैदराबदेतला मानवंशविज्ञानाचा मोठा गंभीर विद्यार्थी आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुळम जिल्ह्यातील पोंदुरू तालुक्यातील खेड्यांमध्ये अभ्यासाला गेला होता. तेव्हा उघड्यावर करण्याची सवय आणि सोय दोन्ही गोष्टी असताना असे आत का ज़ात बसावे असा ग्रामस्थांचा खडा सवाल होता. तसेच केवळ गावचे पटील व त्यांच्या स्त्रिया हे मात्र आपले स्वतंत्र शौचालय बांधून त्यातच ज़ातात म्हणजे हे मोठ्या लोकांचे काम आहे, म्हणून त्यांच्यासारखे करावे म्हणून आपणही आत ज़ावे असा कल सुरुवातीला होता खरं काही गावकर्‍यांचा पण नंतर सवयीने विजय मिळवला व हे असले Sanskritisation काही घडून आले नाही. उलट पाटीलच आदत से मजबूर होऊन हगंदरीच्या मार्गावर आढळतात. असो. मुद्दा हा की शौचालय ही वास्तू बांधून कामाचे नाही, तर शासनाने संवेदनशील सांस्कृतिक ज़ाण, अंग असणारे डिज़ायनर्स गाठून केवळ एर्गोनॉमिक्स नाही तर कल्चरल एर्गोनॉमिक्स ergonomics, Environmental design या सगळ्याच्या पूर्वज्ञानाने ग्रामीण भागात हा उपक्रम राबवायला हवा.

मराठीत हगर्‍या गप्पा म्हणतात ते अशा गप्पांना ज्या उघड्यावर करतांना मारल्या ज़ातात. वास्तवात आपला सगळ्यांचा असा अनुभव असेल की करताना फार नवनवीन विचार, निर्मितिक्षम विचार, भन्नाट कल्पना (ज़शी की शी वर असा ब्लॉग लिहावा!) मनात येतात . यावर म्हणजेच शी करताना मनात सुपीक विचार का, कसे येतात यावर थोर कन्नड लेखक बीचि यांनी संशोधन केले आहे. त्यावर आगामी एखाद्या लेखात लिहू. तर, हगर्‍या गप्पा या टाकाऊ आणि टुकार समज़ण्याचे कारण नाही. पण मराठीत त्याला वाईट किंवा derogatory अर्थ आहे खरा!

आपण सगळे किमान एकदा तरी बाहेर उघड्यावर बसलेले असतो. माझा अस्सल मातीतला अनुभव सांगतो. आपण काही regular outside goer नाही! त्यामुळे बराच वेळ होण्याचे नावच नाही. त्यातही दिवस होता. म्हणून कोणी येत तर नाहीये ना, कोणी आपल्याला बघत तर नाहीये ना याची सतत चिंता, कदाचित त्यामुळेच...! त्यातही सामन्यपणे माणूस एखाद्या झुडपाच्या आडोशाशी बसतो त्यामुळे भूचर सरपटणारे प्राणी तर नाहीयेत ना याकडे सतत लक्ष द्यावं लागतं. मुंग्या, मुंगळे हे तर सर्वव्यापी असतात. अशा एक ना अनेक कटकटी. एक तो शरीरधर्म पण किती ऊर्जा घेणार!

रात्रीतर अवघडच होते. झुडपापाशी ज़ाणे कठीण! टॉर्च घ्यावी तर आपल्याला प्राणी दिसतील खरे, पण त्यामुळे ते आपल्याकडे आकर्षितही होतील हा धोका, त्यात आपण प्राणी बघून करणार काय! उभा माणूस झगडू शकतो, हकलू शकतो किंवा पळू शकतो. बसलेला माणूस एखादा दगड त्या दिशेने भिरकावण्यापलिकडे काय करणार! म्हणजे टॉर्च असूनही नसल्यासारखी.

त्यात ही सगळ्यात मोठी गम्मत. कुत्री ज़शी आपलं क्षेत्र ठरवून घेतात. तसंच बहुधा डुकरं आपण या-या भगात करण्यात आलेली संपवणार असं ठरवून असतात. आपण उठायला आणि अत्यंत कर्तव्यनिष्ठाप्रमाणे डुकराने त्याचा कार्यभार पार पाडायला एकच! इतकी ही तत्परता. त्यामुळे हे भलतेच बीभत्स आणि किळसवाणे होऊन बसते.

Tuesday, January 26, 2010

थंडी आणि शी...

थंडीतील शीतून वाफ़ा निघतात. होय, पण त्यासाठी कडाक्याची थंडी हवी आणि आपल्या झालेल्या शीचे निरीक्षण करण्याची क्षमता. बालमनोविज्ञानानुसार (आमच्या ब्लॉगवरील एक लेख पूर्णपणे शी आणि बालमनोविज्ञान यावर येणार आहे.) बालवयात मुलांना आपल्या शीचे भयंकर अप्रूप असते. शी झाल्यावर तिला भर्रकन भांड्यात पाठवून देणे त्यांना पसंत नसते. आपण काहीतरी मोठे केले आहे असेच त्यांना वाटत असते. शहाण्या आयांनी याची दखल घ्यायला हवी. असो. तर बाहेर कडाक्याची थंडी असेल म्हणजे महाराष्ट्रातील थंडी नव्हे पंजाब, हरियाणा, अशा उत्तरेतील भागातील थंडी असेल तर हमखास आपल्या शी-शूतून वाफ़ा निघतात. तेव्हा आपल्याला काही झालेले नसते. हा सगळा बाहेरच्या वातावरणातील तापामानाचा खेळ असतो. जसे थंडीत आपल्या तोंडातून वाफ़ा निघतात तशाच मागून!

या थंडीत शी धुणे मोठे अवघड होऊन बसते. गरम पाणी असेल तर स्वर्गसुख आणि थंडच असेल तर नरकयातना! बरं आपण पडलो भारतीय त्यामुळे टिशू-कागदाने आपणही पुसून समाधानी होत नाही. शिवाय, त्याने पूर्ण पुसली गेली आहे याची शाश्वतीही नसते. एकूणच थंडीत हात धुणे आणि शी धुणे यासठी गरम पाणी नसले तर याहून मोठी शिक्षा कोणतीच नसते.

दुसरे म्हणजे थंडीतल्या शीत शौचलयांनीही थोडी साथ दिली पाहिजे. खिडकीतून किंवा दाराच्या खालच्या फटीतून येणार्‍या गार वार्‍याच्या झुळका इतक्या बोचर्‍या होतात की त्यामुळे एरव्ही बाहेर सर्वतोपरी झाकलेलं आणि उबेचा साठाच असलेलं आपलं ढुंगण अगदी शहारून ज़ातं आणि गार पडतं. त्यात भरीसभर म्हणजे वरून जीर्ण फ़्लशच्या गळक्या पाईपमधून प्रचंड गार पाण्याच्या टपोर्‍या थेंबांचा अभिषेक होत असेल तर विचारायलाच नको. भलेही अंगावर पडत नसतील ते थेंब; ते ज़मिनीवर पडणार मग त्या टपोर्‍या थेंबाच्या ठिकर्‍या उडणार आणि असे त्याचे बारीक तुषार आपल्या "कधी-एकदाची -शी- संपवतो" असा विचार करणार्‍या नितंबांचे दर ८-१० सेकंदांच्या फरकाने चुंबन घेणार!

थंडीच्या काळात रल्वेत असाल तरी तेच! ३ ए सी असो किंवा स्लीपर संडास तसे सारखेच. रेल्वेच्या संडासातील भांड्याच्या खालच्या भोकातून येणारं गार वारं इतकं भयानक असतं की ज़र आपण संडासात नसतो तर चड्डीतच झाली असती!

Thursday, January 21, 2010

शी विषयी...

"शी" म्हणजे सगळ्यांनी अगदीच "नाकं" (शब्दशः) नाकं मुरडण्याचा विषय.
पण यावर पुष्कळच लिहिण्यासारखं आहे. खरंतर बोलण्यासारखं! आणि तेच मी करणार आहे.
तर हा प्रारंभिक लेख आहे. त्यामुळे शीचे तपशीलवार लेखन पुढे होत राहील पण या विषयाच्या कक्षा आपण ठरवून घेऊ म्हणजे "काय शी करून ठेवलीये!" असं म्हणायला ज़ागा राहणार नाही. या विषयाला एकाएकी "शी-अध्ययन" (She Studies) वगैरे असं नाव आपण देणार नाही. केवळ नोंदवून ठेवू कारण याला अजून एक ज्ञानशाखा म्हणावं अशी सैद्धांतिक, वर्णनात्मक बैठक मिळालेली नाही पण भविष्यात मिळाली तर हे नाव स्पर्धेत राहील. शिवाय "सरशू" (Michel de Certeau) या फ़्रेंच विचारवंताने जसे Practices of Space या लेखाने एक वेगळेच संशोधनक्षेत्र पुढे आणले तसे यातून पुढे येवो!

असो ज़रा औपचारिक सूर ज़ावा म्हणून मी वैयक्तिक गोष्टींनी सुरुवात करतो. शी माझ्यासाठी लहानपणासूनच एक मनोवेधक (interesting) विषय होती. एकतर ती इतरांना ज़शी सोयीच्या वेळी येते तशी ती मला कधी योग्य वेळी भरभरून आलीच नाही. यायची ती अगदी कुठे ज़ायची तयारी पूर्ण झाल्यावर. शाळेत ज़ाताना गणवेश चढवून उत्तम भांग-बिंग पाडून पावडर चोपडून तयार झालं रे झालं की ती यायची. त्यामुळे आवरण्यातला सगळा टवटवीतपणा कमी होतो असं मला वाटे. पण शी होणं फार महत्त्वाचंच! बर्‍याचदा दारावर आलेली रिक्षा, शाळेला होणारा उशीर हे बघता मी शी टाळत म्हणजे दाबतही, पण बर्‍याच अनुभवांती मी शिकलो होतो की शी कधीही दाबू नये. एकदा मी मोठ्या प्रमाणात आलेली शी दाबून शाळेला गेलो होतो. तेव्हा माझा शी दाबून संध्याकाळी नंतर करण्यावर बराच विश्वास होता कारण ते तंत्रच मला साधलं होतं असं मला वाटू लागलं होतं. त्याचा एक तोटा होता की नंतर ती शी बर्‍याच उशिरा येई आणि शीचे स्वरूप (घट्ट इ.) रंगही (पिवळा ते काळा यातल्या छटा) बदलेला असे. पण यासमोर योग्य वेळी न आलेली शी दाबणं काही फार क्लेशकारक नव्हतं. एकदा मी शी दाबून शाळेला गेलो होतो. तेव्हा प्रार्थना, राष्ट्रगीत चालू असतांना येणार्‍या शीच्या कळा दाबण्यात सर्व ऊर्जाच ज़णू खर्च होऊन मी बेशुद्ध होतो की काय असं वाटलं. शिवाय शाळेत शी करणं मला पसंत नव्हतं एकतर फारच साधारण स्वच्छतेचा दर्जा आणि नंतर हात धुण्याची फारच टुकार सोय. म्हणजे डेटॉल लिक्वीडच पाहिजे असा हट्ट नव्हता पण रिन पावडर किंवा कपडे धुण्याच्या साबणाने हात धुणे मला मंज़ूर नव्हते. ते अगदी अल्पशा उरलेल्या कपड्याच्या निळ्या साबणाला हात लावण्याचेही धाडस होत नसे. शिवाय शाळेच्या संडासात भयानक दिसणार्‍या कोळ्यांची इतिहासपूर्वकालीन ज़ाळी होती. ते कोळीसुद्धा लाख-एक वर्षांचे असतील अशा आत्मविश्वासाने तिथे स्थायिक झालेले होते. यामुळे शाळेत शी करण्याचा पर्याय बंद होता. दाबणेही काय करू शकते ते मी अनुभवले होते. त्यामुळे घरूनच करून निघणे हाच एकमेव मार्ग होता.

दुसरे म्हणजे मला एरव्ही बाहेर गावी गेल्यावरही शी सहजासहजी होत नसे. आपले रोजचे झोपेचे ठिकाण सोडून जसे एखाद्याला इतरत्र झोप मुश्किलीने येते तसेच माझे शी चे होते. बाहेरगावच्या ठिकाणचे शौचालय कमालीचे स्वच्छ आणि हवेशीर असेल तर मला काही अडचण नव्हती, पण असे अपवादानेच व्हायचे.

एखाद्या घराच्या [(आणि गृहिणीच्या) असे म्हणण्यात कुठेही असे गृहीत धरलेले नाही की स्त्रियांनीच ही कामे करायची असतात. गृहिणी हा शब्द येथे generic अर्थाने वापरला आहे। ही कामे करणार्‍या घरातील कोणालाही तो लागू पडावा. ज़सा इंग्रजीत Man किंवा मराठीत माणूस, स्त्री व पुरुष दोघांचाही अंतर्भाव करतो तसा गृहिणी केवळ स्त्रीवाचक समज़ू नये!] स्वच्छतेचा दर्जा त्यातील संडासाच्या स्वच्छतेवरून स्पष्ट कळून येतो हे लक्षात ठेवावे. बाकी सारे निकष एकीकडे आणि मोरीच्या स्वच्छतेचा एकीकडे. इतक्या खात्रीपूर्वक अन्य कशावरूनही सांगता येत नाही.

बर्‍याचदा शीच्या अशा वागण्याने मी बाहेर पडण्यापूर्वी एक हजेरी लावून यायचो. झाली तर सोन्याहून पिवळे (की पिवळी!) नाहीतर आपण आपल्याकडून एक प्रयत्न केला होता असे समाधान. संस्कृतात सुभाषित आहे " यत्ने कृते यदि न सिध्यति कोsत्र दोषः" म्हणजेच प्रयत्न करुनही यश आले नाही तर यात काय दोष! शिवाय मराठीतही म्हण आहेच की केल्याने होत आहे रे आधी केलेची (की केलीची) पाहिजे!